Wednesday, 27 March 2013

वसंत

वार्यावर मंद निनादे
ती श्रीकृष्णाची मुरली
त्या अवखळ स्वरलहरीँना
अवखळशी कविता स्फुरली...

ल्याइली आज धरणीने
का गर्भरेशमी शाल
किरणांनी आकाशात
उधळला कशास गुलाल

पसरला रोमरोमी का
अवखळसा एक शहारा
का कसा कुणास्तव आज
हा निसर्ग नटला सारा

पसरली सुखाची चर्या
अन् उडून गेली खंत
अवतरे आज धरणीवर
तो ऋतुराज वसंत


Aditee

Tuesday, 31 July 2012

सरत चालली रात

अजून जागी दोन लोचने
नाव तुझे अधरांत
सख्या रे सरत चालली रात

कुठे राहिला श्याम सावळा
लागे न डोळ्यासी डोळा
का मजला वचनात बांधुनी
उगा फिरविसी पाठ
सख्या रे सरत चालली रात

झुरते कधिची रात्र बोचरी
दुःस्वप्ने घेतात भरारी
कुठली वैरीण सांग मुकुंदा
तुझी अडविते वाट
सख्या रे सरत चालली रात

आर्त तेवते नयनज्योत हि
विरत चालली गर्द प्रीत हि
बघ चन्द्राविन व्याकुळ होती
तारे अवकाशात
सख्या रे सरत चालली रात

बावरलेली प्रीत दिवाणी
अन राधेच्या डोळा पाणी
गेला सोडून श्याम सखा तिज
लोटुनीया विरहात
सख्या रे सरत चालली रात

वचनभंग प्रियकरा कसा हा
सलतो अंगागास दुरावा
येणा दाटून घननिळ्या रे
बरसून ये हृदयात
सख्या रे सालात चालली रात


-अदिती शरद जोशी

Monday, 31 October 2011

पाऊस

आज पुन्हा पाऊस पडला...
पुर्वीसारखा धो धो कोसळला...
गच्च दाटलेल्या डोळ्यांची तो
वाट मोकळी करून गेला..

तेव्हाही असेच दाटले होते
नभी काळेकुट्ट ढग..
अशीच होती संध्याकाळ
त्यात ही अशी विचित्र
घालमेल..अगदी अशीच!

पावसाचं एक बरं असतं
तो कधीही कसाही कोसळू शकतो
कुणासमोरही..
दाटून राहिलेल्या डोळ्यांसारखं
त्याला झुरत बसावं लागत नाही!!

तेव्हाही तो असाच कोसळला
...आणि आजही!
फरक फक्त इतकाच...
तेव्हा डोळ्यांतून पाणी झरत होतं..
आणि आज कागदावर शाई झरतेय!!


अदिती

Monday, 17 October 2011

आठवण

कधीतरी अशाच निवांत क्षणी
तिचं येणं होतं
मन आधीच हळवं,
त्याला तर निमित्तच होतं

सहजतेच्या पडद्यामागून
ती वादळ घेऊन येते
उजळलेल्या स्वप्नांवरून
काजळ फिरवून जाते..

संध्याकाळची रिमझिम
अन् तिचं अवेळी येणं
बरसणारे काळे ढग
डोळ्यांत ठेवून जाणं

सरलेलं सारं काही
ती जिवंत करून जाते..
नव्याने फुलणार्या फुलांना
सहजपणे चिरडून जाते

मनासारखं सांधलेलं सांधलेलं सारं
क्षणात विस्कटून जातं..
असंच कधीतरी अनाहुतपणे
'तिचं' येणं होतं...

अदिती

Sunday, 9 October 2011

The Secret Love

I love it when you look at me
secretly,hiding your face..
And follow me the way back home
trying to catch my pace

I love it when you turn aside
when I catch you staring at me
and when I frankly smile at you,
You too smile back with glee

I love it when you write my name
in your notebook,and then erase
and hide your anger when I ignore you,
with the curtain of smiling face!

I love it when you miss me
when I am not around
and the way your heart skips a beat
when you hear my sound

I love it when the words fall short
when you try to talk with me
I love the way you hide the fact..
That you love me secretly!!

Aditee Joshi

Monday, 19 September 2011

अज्ञात

कुणाचे असे भास छळती अताशा
कुण्या काळचे, ना कुणाला कळे
नभी घन असे गूढ दाटून येता
उगा नीर नेत्रांतूनी का गळे

असे भोवताली सुखाचा सुवास
मनाला भरे का उगा कापरे
काळोख कसला उरी दाटलेला
मन हे उगा का सुखा विस्मरे

कुणाची कमी सतविते या जिवाला
कुणास्तव उदासीन क्षण हे असे
कुणास्तव जिवाची उगा घालमेल
कुणी लावले या मनाला पिसे

उगा या मनी आज काहूर कसले
कश्या आगळ्या याच संवेदना
गड्या हीच अज्ञात जाणिव वेडी
कशी ओळखीने छळे या मना...


अदिती

Monday, 5 September 2011

जपू एकट्याने घडी जीवनाची




नको ओढ ती रे कुणाची,कशाची
जपू एकट्याने घडी जीवनाची
नको फार गुंता आता जीवनात
नको अडकणे रे कुणात,कशात

पुरे जाहले रोज झुरणे अवेळी
पुरे जाहले आठवांचे उसासे
तुझ्यासाठी मी झेलले दाह सारे
आता सावरू दे मनाला जरासे

कधी बंध तुटले,कळलेच नाही
मला तू,तुला मी उमगलेच नाही
आता ओढ अश्रूंत वाहून गेली
सुखाची मनाशी चुकामूक झाली

गड्या व्यर्थ हे प्रेम,सारेच खोटे
क्षणांना उगा जाणिवांचे धपाटे
आता ना तमा रे कुणाची,कशाची
जपू एकट्याने घडी जीवनाची...


अदिती