Friday, 4 July 2014

वारी


श्वासांतून वाहे
सावळा मुरारी..
पायी चाले वारी
पंढरीची||

सावळ्या डोहात
सावळा तरंग
भक्तिरूपी दंग
वारकरी||

बंधने जुनी का
भासती विजोड
देहा लागे ओढ
विठ्ठलाची..||

अधिरश्या जिवा
पावलांची साथ
वसे अंतरात
भक्तियोग ||

पाहता लोचनी
विठ्ठल सावळा
तप्त जीव भोळा
श्रांत होई ||

विष्णुरूपी लीन
होवून मरावे
अंतास उरावे
विष्णूरूप ||

अदिती जोशी
4.7.14
8:42pm

Friday, 6 June 2014

कृष्ण

रूप सावळे आतीव सुंदर
भक्तिरसाचा मनात पाझर
उठे शहारा अंगांगावर
अंतरात वसतो मुरलीधर

निळा गंध त्या निळसर देही
मोहक इतुका तो निर्मोही
वरवर सारे चंचल श्यामल
आत गूढ अविचलसे काही

चराचरांतून घुमे बासरी
सप्तसूर सावळा मुरारी
वाहे यमुना अमृत होवुन
उठती आतुन अथांग लहरी

प्राण नांदतो ह्या तीरावर
त्या तीरावर मन झेपावे
कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे
कृष्णातच समरसून जावे

अदिती जोशी
6/6/2014
11:44 pm

Thursday, 29 May 2014

तू गेलीस तेव्हा...


तू गेलीस आणि मीच मला शोधीत राहिलो..
सुकलेली तुटकी स्वप्ने कुरवाळीत राहिलो
अधरांवर उरली एक अधिरशी हूरहूर ओली
कावितेत तुझ्या मी आठवणी गुंफीत राहिलो..

तू गेलिस तेव्हा सांज जराशी ओली होती
नुकतीच पसरली प्रेमफुलांवर लाली होती
तू अश्रूसम पापणीतुनी ओघळून जाता
तो अश्रू ओला चोहिकडे शोधीत राहिलो..

गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी
अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी
बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा
राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो..

तू सर प्रेमाची चातक मी एकला अधिरसा
रोखून श्वास या इथे उभा मी सखे कधीचा
हा श्वास संपता खोल तुझ्या डोहात बुडावे
इतुकेच मागणे नित्य सखे मागीत राहिलो..

© अदिती शरद जोशी
29/05/2014
4:45 pm

Saturday, 15 February 2014

नाते आपुले तसेच आतून..


जसे फुलावे रंग साजिरे
श्यामनिळ्याच्या मोरपिसातुन
मुके तरी मोहाहुन मोहक
नाते आपुले तसेच आतुन

मी मुरली तू सूर खुळासा
मी यमुना तू माझी खळखळ
तू कविता मी तुझ्या आतली
आर्त खोल दडलेली तळमळ

तू कान्हा मी अधीर राधा
राघव तू मी तुझी मैथिली
नर्तक तू मी नुपुर नादमय
छुमछुमणारे तुझ्या पाऊली

भेट घडे या वळणावरती
अनोळखीशी आज नव्याने
वर वर सारे परके तरिही
जुळले अंतर जुन्या दुव्याने

परस्परांतच परस्परांनी
पुन्हा नव्याने जावे गुंतून
अनोळखी देहात नांदते
नाते आपुले तसेच आतून..

अदिती जोशी

Friday, 17 January 2014

मनास गंध स्पर्शता


ओंजळीत या रित्या कुणी सुगंध पेरले
मनास गंध स्पर्शता शब्द शब्द जाहले ..

भरून अंतरात या कुठून येइ चांदवा
अचूक हेरल्या कुणी खुळ्या अबोल जाणिवा
कुठून रंग पेरती मनी अगम्य कुंचले

रहायचे मनात जे दडून आर्त काहिसे
समूर्त आज जाहले भाव ते खुळे पिसे
मनातले तरंग हे कुणी अचूक झेलले

कशास जीव जाळतो भास पूर्णतः नवा
अनोळखी, तरी कसा स्पर्श वाटतो हवा
ना कळे कधी कसे जिवात जीव गुंतले...

©अदिती जोशी

Sunday, 5 January 2014

सावळ्या तुझ्याविना...


सख्या कधीच लोपली मधाळ धुंद बासरी
तरी अजून गुंजते मुकुंद नाम अंतरी

अबोलशी पहाट ही उदास रे तुझ्याविना
अजून सांज ,सावळ्या, शोधते तुझ्या खुणा
सुनी सुनीच वाहते सुनी नदि सुन्या तिरी

अजून माय साठवी घटा घटात क्षीर रे
अधीरता मनात त्या लोचनांत नीर रे
अशांत ती पुकारते फिरून ये पुन्हा घरी

मनात हर्ष-शोक ना, पल्याड मी हरीप्रिया!
पूर्णतः प्रसन्न मी उदास गोकुळात या
कशास शोधु रे वृथा, मनात या वसे हरी...

अदिती

Wednesday, 6 November 2013

अस्तित्वाच्या पलाड...


अस्तित्वाच्या पल्याड कोठे संथ नदीच्या पैलतिरावर
जललहरींसह वाहत गेली दूर तिथे स्वप्नांची घागर

त्या तीरावर गोकुळनगरी
कान्हाची बेधुंद बासरी
पाहुन लोभस रूप तयाचे, मनही झाले निळसर निळसर

सर्वार्थाने देह लाजला
पाहताच तो रोखुन मजला
नाजुक कटिकमलावर बसला रुतुन तयाच्या नजरेचा शर

हळूच जवळी आला कान्हा
छेडित नाजुक अधरफुलाना
भान हरपले जेव्हा मजला स्पर्शुन गेला तो मुरलीधर

हलवुन मजला गेला वारा
उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा
विरून गेले रूप सावळे
आणिक मागे उरली हुरहुर

©अदिती शरद जोशी 6.11.13