Sunday, 2 August 2015

कळी



वसंत आला, नटली धरती, सुखे बहरल्या तरु-वेली
पानांआडून अवघडलेली एक कळी का रुसलेली ?

हर्ष बहरतो फुलांफुलांवर सुगंध उधळीत बेभान
सतरंगी ही फूलपाखरे गाती गंधित मधुगान
सोन सकाळी ह्या वेलींवर भृंग गुंफती सूर किती..
पानांवरती होवुन मोती दवबिंदू हे लखलखती
देव उभ्या ह्या दिव्यत्वाला तेज अर्पितो सोनसळी,
आणिक येथे बावरलेली झुरते का ही एक कळी?

"गंध फुलांना,भृंग सूरमय, फूलपाखरे रंगित ही
पक्ष्यांची अनमोल सुरावट, सृष्टी रचते संगित ही
दिव्य सृष्टीच्या निर्मात्याने मला रंग ना रूप दिले
कुरूप वेडी दुर्लक्षित मी, जगणे हे जगणे कसले
कधी वाटते देठ सोडुनी चुंबावी ओली माती
मान टाकुनी धरणीवरती विरून जावे निर्वाती"

कळी भाबडी एकलकोंडी होती कधिची बसलेली
अबोध वेडी नितांत सुंदर जगण्यावरती रुसलेली....

निळसर वारा तोच कुठुनसा माळुनी आला गंध नवा
सूर्यकिरण हे नभाआडुनी आले घेऊन तेज दिवा
चुंबुनी वारा म्हणतो कळिला, "ऊठ खुळे हे तेज पहा..
कोमल तुझिया देहावरती जणू तळपले सूर्य दहा
कोष मिटुन का बसलिस वेडे,पसर पाकळ्या उमलून ये
गूज आतल्या सौंदर्याचे सखे एकदा जाणून घे..!"

वात स्पर्शता कळी उमलली, बहर पसरला चोहिकडे
भाळून अवघे रान तिच्यावर शिंपडते कौतूक सडे
स्वत्वाचे हे गूज जाणुनी उमलुन आले फूल नवे
आतिव सुंदर आयुष्यावर,जगण्याचे अर्पून दिवे

©अदिती जोशी

Wednesday, 24 June 2015

दाटून मेघ येता...


दाटून मेघ येता अवचीत सांजवेळी
त्या संथशा नदीला सुचल्या अबोल ओळी

हुंकार गर्जनांचा देई कुठून हाक
का मेघ सावल्यान्ना पुसती सवाल लाख?

काळोख भेदणारी ये वीज लखलखूनी
हळूवार रात गाते मग एकटीच गाणी

विरहात पोळलेली धरती पुन्हा नव्याने
उमलून आज येई, मन दरवळे सुखाने

वर्षाव मीलनाचा मन जाय मोहरूनी
सांगे नदी वनाला ही आगळी कहाणी

© अदिती जोशी

Wednesday, 22 April 2015

द्वारकाधीश


मन श्रावण ओला, मन यमुनेचा तीर
मन स्वैर पाखरू घुमणारे भिरभीर
मन लहर जळाची उसळे व्यर्थ दहादा
मन वृन्दावानिची अबोल वेडी राधा

मन मागे पडले खिन्न आर्त गोकूळ
मन माय एकटी अधिर, विरह-व्याकूळ
मन क्षीर शुभ्र, मन फुटलेला घट ओला
मन मोरपंख केसात जुना रुजलेला

मन वेडा कान्हा, मन ओला घननीळ
मन सांज केशरी, मन वेळूची शीळ
मन अथांग सागर, मन तुटलेले पाश
मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश...

अदिती जोशी


Friday, 6 March 2015

The Night..



With freezing enormity
With harrowing darkness..
Cold, whey faced,
deep down I dwell

Some call me a phase..
some call me a fact!
some sleep through me..
some stay intact.

You adore the dusky elegance
you adore the saffron hue
Then I strike you with fright
as a bolt from the blue

Beyond my saffron disguise,
beyond your guileless faith..
deep down lies
a creepy dark wraith

beyond every dusk,
safe, calm and quiet...
like a shrewd demon,
there stands the night..

-Aditee

किनारा



थेंब होऊनी वाहत जाता
आयुष्याच्या प्रवाहासावे
वाटे एका वळणावरती
मागे वळुनी तुला पहावे

दूर तिथे ह्या क्षितिजापासून
पल्याड तू एकटा किनारा
जलबिंदू मी अजाण होते
तुझ्या भोवती घुटमळणारा

कुणा कळेना कसे लागले
वेड तुला ह्या जलथेंबाचे
अजाण वेडी वाहायचे मी
ध्येय घेउनी राविबिम्बाचे

शेवटास मी पाश तोडूनी
पुढे निघाले, पाठ फिरेना
असाह्य मागे तुझा चेहरा
मनातुनी सारता सरेना

सोबतीस तव असंख्य लहरी
तरीही तू आतून कोरडा
वरवर मीही शांतच असते
तव स्मरणांचा आत ओरडा

भेट जरी प्राक्तनात नाही
परस्परांचे उरी उसासे
शुष्क तिथे तू दूर कधीचा
शुष्क इथे हे श्वास जरासे

वाहत जाता प्रवाहासावे
आस उरे अंतरी एकटी
पुढल्या जन्मी प्रवाह रोखून
तू मझा होशील सोबती

अदिती

Tuesday, 13 January 2015

सांज




सांज बावरी,सांजेला कळते ना काही
शांत बाह्यतः,आतुन ही घोंगावत राही

सांज बोचरी,काळोखाची पूर्वकल्पना
वर केशरिया,अंतरात दडल्यात वेदना

सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी
नेत्र पश्चिमी,मन पूर्वेच्या क्षितिजापाशी

सांज हरीच्या बाहूंमधली राधा भोळी
मोहनरंगी रंगुन बनते रात्र सावळी...

अदिती जोशी
13/1/15
10:30 pm

Thursday, 21 August 2014

कर्ण....




लोपून तेज जाता हलकेच पश्चिमेला
बघ चोरपावलांनी चालून रात्र येई
निजले नभात तारे ,निजली उभी धरा ही
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही?

इवली पहा झळाळे नाजूक सोनकाया
इवलाच देह भासे इवला हिरण्यगोल
तेजाळल्या कळ्यांची कानात कुंडले ही
तेजावली झळाळे डोळ्यातुनी अबोल

तू तेजगोल बाळा, मी गालबोट काळे
रे सोनुल्या तुला मी सोडून दूर जाते
घोंगावुनी कधीचा अंधार वाहणार्या
मी सावळ्या नदीला हा तेजपुत्र देते

तव दिव्य स्पर्श होता उजळेल विश्व सारे
मागे उरेल वेडी असहाय्य माउली ही
निजली अबोल माया ह्या बंद पेटिकेत
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही ?

© अदिती जोशी
22.8.14
1:23 am