Wednesday, 10 August 2011

सैनिकहो तुमच्यासाठी

वादळाची शाल करुनी
अन तृषेची ढाल करुनी
कंटकांच्या गालिच्यावर
पाउले पडती

झेलला अंधार आहे
वादळाचा वार आहे
हासण्याने परी तयांच्या
दाहही कुढती

शौर्य ज्यांचा धर्म आहे
त्याग ज्यांचे कर्म आहे
मातृभूमिस्तव जयांची
मृत्यूवर प्रीती

अश्रू अलंकार ज्यांचा
घर्म हा शृंगार ज्यांचा
तेच पोलादी गडी हे
विश्व रे जपती

कोटी कोटी प्रणाम त्यांना
शत शत सन्मान त्यांना
मातृभिमिस्तव जयांनी
दिधली आहुती...


अदिती





Monday, 8 August 2011

मृगजळ

मन हरखून जाते पाहुन तुजला,
हुरळून जाते पार..
हास्य उमटते चेहर्यावरती
जग भासे अलवार..!

देही फुलतो मोरपिसारा
एकच लागे आस
मन धडपडते तुझ्याचसाठी
तव भेटीचा ध्यास

वैशाखातही कृष्ण अभ्र का
गगनी या दिसती?
भरदिवसाही शीत तारका
मनामध्ये वसती

रवी प्रखर हा आग ओकतो..
देही तप्त झळा
तरी का गातो श्रावणगीते
तहानलेला गळा??

तव भेटीची ओढ जिवाला,
पैलतिराची आस
पैलतिर तो गाठण्याचा
तुझ्याचसाठी ध्यास

वणवण करितो जीव तुझ्यास्तव
जाणुनही अज्ञात
तुझे भासणे फक्त स्वप्न रे
मृगजळ फक्त अफाट..
तो मृगजळ फक्त अफाट..


अदिती जोशी

Sunday, 7 August 2011

हल्ली नेहमी असंच होतं

हल्ली नेहमी असच होतं.....
आत खूप काही दडलेलं असतं,पण लिहायला जावं तर शब्दच सुचत नाहीत! या शब्दांना पण ना..छंदच जडलाय...एकसारखा मनाशी लपवाछपवीचा खेळ खेळत असतात! मन तर तसंही आधीच गोँधळलेलं...ते आणखी गोंधळतं...बावरतं..! खूप काही साचलंय आत,पण शब्दांचे ओघळ वाहतच नाहीत..! कधी रिमझिमणारा पाऊस पाहिला ना,की हळूच मनाच्याही नकळत या शब्दांची रिमझिम सुरू होते...पटकन काहीतरी सुचतं..पण श्रावणाची सर जशी पटकन थांबावी तसा शब्दांचा प्रवाह थांबतो...मनातल्या भावनांचा साठा काही केल्या बाहेर पडत नाही! जीव कासावीस होत राहतो नुसता! बहुदा शब्दच माझ्यावर रुसले असावेत..पण नेमकं का? आजवर दिवसभराच्या धावपळीतून नेहमी त्यांच्यासाठी वेळ काढत आलीये मी. कधीकधी तर फक्त त्यांच्यासाठी मी आणि माझ्यासाठी ते होते. आजवर गहिवरलेल्या मनाला त्यांनीच दिलासा दिलाय..मग आज हा अजब खेळ कशासाठी?
असो..! काही प्रश्नांना उत्तरं नसतातच..! आणि शब्दांचं म्हणाल तर त्यांना रुसवा सोडावाच लागेल...शेतकर्याचा अंत बघणारा पाऊस कधीतरी त्याच्या मनासारखा कोसळतोच ना? तसंच आहे यांचंही...


अदिती जोशी

Wednesday, 27 July 2011

विरह

भिजलेली पाउलवाट
अन् भिजलेला किनारा
भिजवीती आज नयनांना
विरहाच्या अश्रूधारा..

मन तुझ्यात रे घुटमळते
सतविती तुझे ते भास
तू कधीतरी येशील रे
लागली जिवाला आस

स्मरती त्या लाघव भेटी
तो तुझा स्पर्श अलवार
स्मरती त्या शपथा स्वप्ने
प्रेमाची अमृतधार..!

रे आज तरी तू यावे
अन् माझे नयन पुसावे
तव मिठीत घेऊन मजला
प्रेमाच्या गावा न्यावे

निःशब्द भावना माझ्या
तुजला सार्या उमगाव्या
विरहाचे अभ्र गळावे
अन् प्रेमसुधा बरसाव्या...

अदिती जोशी

हुरहुर

मन एकाकी अबोल सांजराती...
हुरहुर ही अवेळी कुणासाठी?

मेघ आकाशी दाटले काळेभोर
सौख्य देहा या स्पर्शते मऊशार
गीत तरी का उदासीन वेड्या ओठी??

कशासाठी या उरात घालमेल?
तृप्त तरी का थरथरे सांजवेल?
ओल्या पाण्यात नयने ओथंबती...

आता काळोख दाटला भोवताली
सांज हळूच मिटली,रात झाली!
ओल्या सरी मनामध्ये येत-जाती

कुणा शोधे तमामध्ये वेडे मन?
हुरहुर अंतराला लावी कोण?
वारा छेडी सांजधून कशासाठी??

वेड लावी या मनाला सांजवेळ
कशासाठी जीवघेणा खेळे खेळ?
दाही दिशा अवचित अंधारती...

मन एकाकी अबोल सांजराती...
हुरहुर ही अवेळी कुणासाठी?

अदिती जोशी

Tuesday, 26 July 2011

भाकरतुकडा

हाडकुळलेला देह,खपाटलेलं पोट
तृषार्थाने तळमळणारे अन् कोवळे ओठ
ध्येयाच्या आसेने झपाटलेलं मन
दारिद्र्याने झिजवलेलं पोळलेलं तन
माउलीच्या कुशीतलं अजाण कोवळेपण
भुकेपोटी तळमळणारं वेडंपिसं मन
आकाशीच्या चांदव्याला एकटक न्याहाळताना...
माऊलीचे भरले डोळे अलगद पुसताना
म्हणे,नको रडु माये नको खंत करू
बघ नक्षत्रांनी हे आभाळ आले भरू
नक्षत्रांनी केले तुझ्यासाठी ग दागिने
नको तळमळू पोटा आतल्या आगीने
भूक भागवेल आता धीर धर थोडा..
चांदण्यांच्या मध्ये बघ भाकरतुकडा...
चांदणयांच्या मध्ये बघ भाकरतुकडा...

अदिती जोशी

Monday, 25 July 2011

पाऊस

पाऊस....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय...! स्वैर,स्वच्छंदी....कधी हवाहवासा,तर कधी नकोनकोसा वाटणारा..! कधी लहान,खोडकर मुलासारखा उनाड,अचानक धो धो कोसळणारा..तर कधी नवयुवती सारखा लाजाळू,रिमझिम बरसणारा..
कधी तो जिवाभावाचा सखा होऊन आपल्याबरोबर बागडत राहतो,कधी प्रीयकर होऊन घट्ट बिलगतो,तर कधी वैरी होऊन जन्माची अद्दल घडवतो...
त्याची अशी अनेक रूपं...अनेक रंग...एकमेकांपासून भिन्न,तरी एकमेकांशिवाय राहू न शकणारे..
त्याचा प्रत्येक थेंब काहीतरी सांगत असतो..झाडांना,प्राण्यांना,पक्ष्यांना,माणसांना...त्याची रिमझिम अबोलपणे खूप काही बोलून जाते...आणि हा पाऊस जो खर्या अर्थाने जगतो ना..त्यालाच कळतो या निरर्थकपणे बरसणार्या पावसामागे दडलेला अर्थ...

अदिती जोशी