सावळ्या रंगात का
घन आज हे न्हाले
सावळ्याची ओढ वेडी
मन पाखरू झाले
बासरीचा सूर घुमतो
फुलती स्वप्नफुले
पैलतिरातून साद ऐकुनी
जीव उगाच झुरे
पैलतिरावर तो मुरलीधर
वाजवितो वेणू
धुंद होवुनी मयुर नाचती
हसते इन्द्रधनु
छुमछुम करती अधीर पैंजणे
श्यामनिळ्याचे भास
पाउल वळते पैलतिरी त्या
मोहून जातो श्वास
वेड्या त्या सावळ्या सख्यास्तव
धडधडते हे ऊर
वेड लाविती उगा जिवाला
त्या वेणूचे सूर
आज सख्या रे माझे 'मी'पण
हरवून मी बसले
तुझे सावळे रूप मनोहर
मनामध्ये ठसले
तव स्पर्शाची तहान आता
शतजन्मांची आस
तुझीच मूर्ती मनात माझ्या तुझाच रे सुवास
रे श्रीरंगा धडपडते मी
तव भेटीस्तव आज
बरस बरस तू अभ्र होवुनी
भिजव अंगांगास..
तृप्त होवुदे धरणी सारी
तृप्त कर तन मनास
तळमळते ही वेडी राधा
बरस बरस तू आज...
अदिती