कुणाचे असे भास छळती अताशा
कुण्या काळचे, ना कुणाला कळे
नभी घन असे गूढ दाटून येता
उगा नीर नेत्रांतूनी का गळे
असे भोवताली सुखाचा सुवास
मनाला भरे का उगा कापरे
काळोख कसला उरी दाटलेला
मन हे उगा का सुखा विस्मरे
कुणाची कमी सतविते या जिवाला
कुणास्तव उदासीन क्षण हे असे
कुणास्तव जिवाची उगा घालमेल
कुणी लावले या मनाला पिसे
उगा या मनी आज काहूर कसले
कश्या आगळ्या याच संवेदना
गड्या हीच अज्ञात जाणिव वेडी
कशी ओळखीने छळे या मना...
अदिती