
थेंब शब्दांचे तुझ्या झेलीत होते
राहिला साचून तेथे षड्ज वेडा
आर्त वेणूचे जिथे संगीत होते
थिरकते ही एकटी जेथे अबोली
त्या तिथे शून्यात होती रासलीला
हळहळे अजुनी घडा फुटका, रिकामा
खोड माझी काढण्या तू फोडलेला
नादती येथे वृथा का पैंजणे ही
छेडता दूरात तू मंजूळ पावा
रे मुकुंदा श्वास माझे जहर व्हावे
एवढा सलतो जिवाला हा दुरावा
मान्य हे कळले जरा मजला उशीरा
की तुझ्या असण्यातही नसणेच होते
भाळले ज्याच्यावरी गोकूळ सारे
सावळे ते हास्यही उसनेच होते
संपला सहवास सरल्या गोड भेटी
प्रश्न केवळ राहिला वेड्या मनाचा
मी तुझी, यमुना तुझी, अन् गोपिकाही!
सांग पण मधुसूदना रे तू कुणाचा....?
© अदिती जोशी
22.10.2015
17:30