Tuesday, 15 October 2013

बेधुंद मनीचे बोल...


बेधुंद मनीचे बोल
निसटून चालले होते
चंचलशा त्या लहरींना
मी हळूच टिपले होते

ते बोल खुळेसे काही
अविचल त्या अस्फुट तारा
वळणाशी भिरभिरणारा
तो सोसाट्याचा वारा
बांधून कधीचे ज्यांना
मी उरात जपले होते
चंचलशा त्या लहरींना
मी हळूच टिपले होते

मी बोल बोलता सारे
अस्तित्वच बहिरे झाले
अविभाव आर्त स्वत्वाचे
ते अजून गहिरे झाले
जिद्दीच्या तेज कणांनी
आयुष्य रापले होते
चंचलशा त्या लहरींना
मी हळूच टिपले होते...

त्या उधाणलेल्या लहरी
संकोच गोठवुन गेल्या,
विझलेल्या सामर्थ्याला
अवचीत पेटवुन गेल्या...!
मी ध्येय गाठले तेव्हा
हे भान हरपले होते...
चंचलशा त्या लहरींना
मी हळूच टिपले होते...

© अदिती शरद जोशी
16.6.13
2:37pm