Saturday, 15 February 2014

नाते आपुले तसेच आतून..


जसे फुलावे रंग साजिरे
श्यामनिळ्याच्या मोरपिसातुन
मुके तरी मोहाहुन मोहक
नाते आपुले तसेच आतुन

मी मुरली तू सूर खुळासा
मी यमुना तू माझी खळखळ
तू कविता मी तुझ्या आतली
आर्त खोल दडलेली तळमळ

तू कान्हा मी अधीर राधा
राघव तू मी तुझी मैथिली
नर्तक तू मी नुपुर नादमय
छुमछुमणारे तुझ्या पाऊली

भेट घडे या वळणावरती
अनोळखीशी आज नव्याने
वर वर सारे परके तरिही
जुळले अंतर जुन्या दुव्याने

परस्परांतच परस्परांनी
पुन्हा नव्याने जावे गुंतून
अनोळखी देहात नांदते
नाते आपुले तसेच आतून..

अदिती जोशी