पुन्हा नव्याने फुलती स्वप्ने
पुन्हा नव्या उलगडती वाटा
पुन्हा नवी अधरांवर लिहिली
नाविन्याची लोभस गाथा
अस्तित्वाचा नवा अर्थ अन्
जगणे सारे नवेच झाले
बुरसटलेले पाश तोडुनी
नवे पाखरू नभी उडाले
नव्या नव्याची नवलाई ही
व्यापुन घेते सारे जीवन
नव्या नभीची नवीन बिजली
छेदून जाते जुने कृष्ण घन
नव्या सुरांची नवी भुपाळी
नवी सुगंधी पहाट गाते
अधीर राधा पुन्हा नव्याने
श्यामनिळ्याची होऊन जाते
अदिती