Tuesday, 5 September 2017

रात्र


दूरात चंद्रमाचा मधुरम्यसा महाल
फिरती सभोवताली तारांगणे विशाल
निष्पाप कोवळ्या ह्या गोष्टीत दंगलेली
चैतन्य शैशवाचे उधळीत रात्र आली ...

तो स्पर्श पावसाळी तो चिंब देह ओला
तो केवडा सुगंधी केसात माळलेला
तो मोरपीस वेडा भिरभीर होय गाली
हळुवार मालवूनी नक्षत्र, रात्र आली ...

स्वप्नील लोचनात साचून चंद्रतारे
गगनात घे भरारी, जिंकून घे दिशा रे
तारुण्य ध्येयवेडे लेवून आज भाळी
वाटा नव्या यशाच्या शोधीत रात्र आली ...

थकल्या सुन्या दिशा ह्या अन वाट संपलेली
आता छटा सुखाची अंतात गुंफलेली
अंकूरण्या नव्याने झडुदेत जीर्ण वेली
चाहूल शेवटाची मिरवीत रात्र आली...

© अदिती जोशी