
वसंत आला, नटली धरती, सुखे बहरल्या तरु-वेली
पानांआडून अवघडलेली एक कळी का रुसलेली ?
हर्ष बहरतो फुलांफुलांवर सुगंध उधळीत बेभान
सतरंगी ही फूलपाखरे गाती गंधित मधुगान
सोन सकाळी ह्या वेलींवर भृंग गुंफती सूर किती..
पानांवरती होवुन मोती दवबिंदू हे लखलखती
देव उभ्या ह्या दिव्यत्वाला तेज अर्पितो सोनसळी,
आणिक येथे बावरलेली झुरते का ही एक कळी?
"गंध फुलांना,भृंग सूरमय, फूलपाखरे रंगित ही
पक्ष्यांची अनमोल सुरावट, सृष्टी रचते संगित ही
दिव्य सृष्टीच्या निर्मात्याने मला रंग ना रूप दिले
कुरूप वेडी दुर्लक्षित मी, जगणे हे जगणे कसले
कधी वाटते देठ सोडुनी चुंबावी ओली माती
मान टाकुनी धरणीवरती विरून जावे निर्वाती"
कळी भाबडी एकलकोंडी होती कधिची बसलेली
अबोध वेडी नितांत सुंदर जगण्यावरती रुसलेली....
निळसर वारा तोच कुठुनसा माळुनी आला गंध नवा
सूर्यकिरण हे नभाआडुनी आले घेऊन तेज दिवा
चुंबुनी वारा म्हणतो कळिला, "ऊठ खुळे हे तेज पहा..
कोमल तुझिया देहावरती जणू तळपले सूर्य दहा
कोष मिटुन का बसलिस वेडे,पसर पाकळ्या उमलून ये
गूज आतल्या सौंदर्याचे सखे एकदा जाणून घे..!"
वात स्पर्शता कळी उमलली, बहर पसरला चोहिकडे
भाळून अवघे रान तिच्यावर शिंपडते कौतूक सडे
स्वत्वाचे हे गूज जाणुनी उमलुन आले फूल नवे
आतिव सुंदर आयुष्यावर,जगण्याचे अर्पून दिवे
©अदिती जोशी
