
ती सर ओघळता सोबतीस मी झरतो
तो मेघ झुरावा तैसा मीही झुरतो
आपुलेच काही तुटुन ओघळून जावे
खेदात तशा मी कणा कणाने विरतो...
ती सर ओघळता विझती स्वप्नदिवेही
अन दिवसासंगे विझून जातो मीही
अन लख्ख काजळी गगनी दाटून येता
मी आशेचे कण शोधित भिरभिर फिरतो
ती ओघळता मी सुना एकटा पक्षी
पंखांच्या जागी असाह्यतेची नक्षी
शेवटास मीही काव्यपंख लेवून
आठवांभोवती तिच्या नित्य भिरभिरतो
ती सर ओघळता उरे न काही बाकी
सहवास सरे अन अंती मी एकाकी
ती सरीसारखी चंचल आर्त प्रवाही
तिज धरू पाहता मीच दिवाणा ठरतो
©अदिती जोशी