
लोपून तेज जाता हलकेच पश्चिमेला
बघ चोरपावलांनी चालून रात्र येई
निजले नभात तारे ,निजली उभी धरा ही
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही?
इवली पहा झळाळे नाजूक सोनकाया
इवलाच देह भासे इवला हिरण्यगोल
तेजाळल्या कळ्यांची कानात कुंडले ही
तेजावली झळाळे डोळ्यातुनी अबोल
तू तेजगोल बाळा, मी गालबोट काळे
रे सोनुल्या तुला मी सोडून दूर जाते
घोंगावुनी कधीचा अंधार वाहणार्या
मी सावळ्या नदीला हा तेजपुत्र देते
तव दिव्य स्पर्श होता उजळेल विश्व सारे
मागे उरेल वेडी असहाय्य माउली ही
निजली अबोल माया ह्या बंद पेटिकेत
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही ?
© अदिती जोशी
22.8.14
1:23 am