नको ओढ ती रे कुणाची,कशाची
जपू एकट्याने घडी जीवनाची
नको फार गुंता आता जीवनात
नको अडकणे रे कुणात,कशात
पुरे जाहले रोज झुरणे अवेळी
पुरे जाहले आठवांचे उसासे
तुझ्यासाठी मी झेलले दाह सारे
आता सावरू दे मनाला जरासे
कधी बंध तुटले,कळलेच नाही
मला तू,तुला मी उमगलेच नाही
आता ओढ अश्रूंत वाहून गेली
सुखाची मनाशी चुकामूक झाली
गड्या व्यर्थ हे प्रेम,सारेच खोटे
क्षणांना उगा जाणिवांचे धपाटे
आता ना तमा रे कुणाची,कशाची
जपू एकट्याने घडी जीवनाची...
अदिती