
शुभ्र कोऱ्या चांदव्याशी हासले माझीच मी
धुंद हळव्या शब्दगंधी गुंतले माझीच मी..
लाख स्वप्ने गुंफुनी मी बांधली तारांगणे
उसवता अलवार टाका उसवले माझीच मी
सौख्यसमयी भोवताली लाख होते सोबती
आणि दु:खाच्या घडीला सोबती माझीच मी
हाय तू तुडवून जाता दूर प्रीतीची फुले
त्या फुलांच्या अत्तरासम बहरले माझीच मी
मतलबी सारेच येथे, नाहि कोणाचे कुणी
मुखवटे नुसते सभोती, शेवटी माझीच मी!
© अदिती