Tuesday, 31 July 2012

सरत चालली रात

अजून जागी दोन लोचने
नाव तुझे अधरांत
सख्या रे सरत चालली रात

कुठे राहिला श्याम सावळा
लागे न डोळ्यासी डोळा
का मजला वचनात बांधुनी
उगा फिरविसी पाठ
सख्या रे सरत चालली रात

झुरते कधिची रात्र बोचरी
दुःस्वप्ने घेतात भरारी
कुठली वैरीण सांग मुकुंदा
तुझी अडविते वाट
सख्या रे सरत चालली रात

आर्त तेवते नयनज्योत हि
विरत चालली गर्द प्रीत हि
बघ चन्द्राविन व्याकुळ होती
तारे अवकाशात
सख्या रे सरत चालली रात

बावरलेली प्रीत दिवाणी
अन राधेच्या डोळा पाणी
गेला सोडून श्याम सखा तिज
लोटुनीया विरहात
सख्या रे सरत चालली रात

वचनभंग प्रियकरा कसा हा
सलतो अंगागास दुरावा
येणा दाटून घननिळ्या रे
बरसून ये हृदयात
सख्या रे सालात चालली रात


-अदिती शरद जोशी