तव प्रीतीमध्ये नखशिकांत मी बुडले
झेलले तुझे मी दाहक सारे वार
पण प्रेमाला संहार म्हणाले नाही..
आपले म्हणाले जे जे परके होते
शेवटास माझे श्वास पोरके होते
एकटेच जगणे माझ्या वाट्या आले
पण "दे मजला आधार" म्हणाले नाही!
रे मजला तू वचनात बांधले होते
संसाराच्या स्वप्नांत सांधले होते
उधळून डाव निघून जातानाही..
"कर स्वप्ने ती साकार" म्हणाले नाही!
ही भकास उरली सोबतीस अंधारी
तू सोडुन जाता ठरले मीच भिकारी
तो सूर्य सुखाचा बुडून गेला तेव्हा
मी "नको मला अंधार" म्हणाले नाही!
© अदिती
27.6.13