Wednesday, 27 March 2013

विसर

भातुकलीचा रंगलेला संपला ग डाव
आता तुला गाठायचा आहे तुझा गाव
आवर सारे तुझे तुझ्या सोबती घेऊन जा
आठवणी तुझ्या इथे तेवढ्या ठेवून जा

तुला पुन्हा मांडायचा आहे नवा खेळ
तुझ्या माझ्या सोबतीची संपली ग वेळ
विसर सखे ओळखीच्या जुन्या वाटा सार्या
हृदयाशी बांधलेल्या सोड जुन्या दोर्या

हरवुदे सोबतीने गुंफलेली माळ
हरवुदे वाट आडवळणी खट्याळ
खुणावती तुला तुझ्या नशिबाच्या रेघा
तुला-मला तोड आता धागा

नको सखे निरोपाचे उगा अश्रू ढाळू
जायचीच निसटून हातातली वाळू

सोसायचा तुझ्या-माझ्या नात्याला दुरावा
जायचे जरी तुला ग सखे तुझ्या गावा...
राहीन मी तुझ्या उरामध्ये ग दाटून
कधी तुझ्या डोळ्यातून येईन बरसून .....


-अदिती शरद जोशी

1 comment:

  1. अर्थवाही काव्य.
    सुंदर जमलेय.

    ReplyDelete