
युगायुगांची फरफट तरिही,अजून आहे मी वनवासी
नवा साज अन् नवे रूप मज,भोग तरीही जुनेच पदरी
आसपासचे नवीन चेहरे,जुनीच तरिही नजर विखारी
नवे ध्येय मज गाठायाचे,जुनी तरी भिँतीँची घुसमट
उंबरठ्याच्या पल्याड अजुनी जुनेच भयकंपाचे सावट
जुने बोचरे शब्द जगाचे,जुनी टोचणी सले उराशी
युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी
अजून उठती शर शंकांचे मर्यादा मी लंघून जाता
जनलज्जेच्या खेळामध्ये हरलेली मी अगतिक सीता
अन् काळोखी वळवणावरती टपून आहे नवा पारधी
नव्या कुरूंनी विटंबिलेली नव्या युगी मी नवी द्रौपदी
मी माता मी भगिनी भार्या,तरी जगाला नकोनकोशी
युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी
मी कान्हाच्या वेणुमधली उषःकालची नवी भुपाळी
मध्यान्हीची मीच सावली वायुलहर मी सायंकाळी
मीच तुझ्या नात्यांची दोरी मीच तुझी ममतेची छाया
अडखळता तुज सावरणारी मीच शांतशी शीतल माया
सामर्थ्याची मशाल हाती धगधगणारे दुःख उराशी
युगायुगांची फरफट तरिही अजून आहे मी वनवासी
© अदिती जोशी
25.9.13
02:55 am
Aditee a grand salute to you.
ReplyDeleteसुंदरच लिहिली आहेस ही कविता.
'जनलज्जेच्या खेळामध्ये हरलेली मी अगतिक सीता' आणि
'नव्या कुरूंनी विटंबिलेली नव्या युगी मी नवी द्रौपदी '
सुंदरच, वर्तमानाला इतिहासाचे संदर्भ देऊन फारच छान उतरवली आहेस ही कविता.
Simply Superb n touching too.