Friday, 6 March 2015

किनारा



थेंब होऊनी वाहत जाता
आयुष्याच्या प्रवाहासावे
वाटे एका वळणावरती
मागे वळुनी तुला पहावे

दूर तिथे ह्या क्षितिजापासून
पल्याड तू एकटा किनारा
जलबिंदू मी अजाण होते
तुझ्या भोवती घुटमळणारा

कुणा कळेना कसे लागले
वेड तुला ह्या जलथेंबाचे
अजाण वेडी वाहायचे मी
ध्येय घेउनी राविबिम्बाचे

शेवटास मी पाश तोडूनी
पुढे निघाले, पाठ फिरेना
असाह्य मागे तुझा चेहरा
मनातुनी सारता सरेना

सोबतीस तव असंख्य लहरी
तरीही तू आतून कोरडा
वरवर मीही शांतच असते
तव स्मरणांचा आत ओरडा

भेट जरी प्राक्तनात नाही
परस्परांचे उरी उसासे
शुष्क तिथे तू दूर कधीचा
शुष्क इथे हे श्वास जरासे

वाहत जाता प्रवाहासावे
आस उरे अंतरी एकटी
पुढल्या जन्मी प्रवाह रोखून
तू मझा होशील सोबती

अदिती

No comments:

Post a Comment